भुसावळ : आगामी पालिकेच्या निवडणूकीसाठी दोन सदस्यीय प्रभाग रचनेच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. तसेच प्रभाग रचनेबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आगामी निवडणूक सन 2011 च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रभागात कोणतेही बदल होणार नाहीत. सन 2016 मध्ये झालेल्या निवडणूकीचे जशीच्या तशी वॉर्ड रचना आगामी काळातही कायम राहणार आहे. केवळ नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत आगामी काळात काढली जाईल.

फायदा प्रस्थापितांना की नवख्यांना ? वेळच ठरवणार
पालिकेच्या निवडणूकीसाठी यापूर्वी असलेली दोन सदस्यीय प्रभाग रचना पध्दत रद्द करुन सिंगल वॉर्ड पध्दतीने निवडणूक होणार होती. मात्र यानंतर पून्हा निवडणूक आयोगाने दोन सदस्यीय प्रभाग रचनेच्या संदर्भात निर्देश दिले. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने नगरपलिका प्रशासनाला प्रभाग रचनेच्या संदर्भातही प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत. या निवडणूकीत सन 2011 ची लोकसंख्या गृहीत धरुनच वॉर्ड रचना केली जाणार आहे. सन 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत असलेली प्रभाग रचना या निवडणूकीतही जशीच्या तशी कोणतेही बदल न करता वापरली जाईल. भुसावळसह संपूर्ण राज्यात याच पध्दतीने प्रभाग रचना केली जाणार आहे. भुसावळ पालिका निवडणूकीतही हीच प्रभाग रचना वापरली जाणार असल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले. दरम्यान पालिका प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे निवडणूक कार्यक्रमात यावर हरकती घेणेसाठी मुदत दिली जाणार आहे. प्रभाग रचना पूर्वीचीच असल्याने प्रस्थापितांना की नवख्यांना फायदा होईल? याबाबत शहरात मंथन सुरु आहे.
आरक्षण सोडत होणार
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार 50 टक्के पेक्षा आरक्षण वाढू नये, यासाठी बंधने आहेत. सध्या पालिकेतील एससी साठी सात तर एसटी प्रवर्गासाठी 2 असे 9 आरक्षीत जागा आहेत. आगामी निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पध्दत नसून नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवड होईल. या प्रक्रियेत प्रभागांच्या आरक्षण सोडतीसोबत नगराध्यक्षपदाचीही आरक्षण सोडत होईल, असेही मुख्याधिकारी चिद्रवार यांनी सांगितले.


