भुसावळ – ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरू असून या प्रणालीत अनेक अडचणी येत आहेत. दुर्दैवाने लिंक ओपन न होणे, पुढे न सरकणे किंवा फोटो अपलोड न होणे, सबमिट न होणे, भाषा न बदलणे या अनेक अडचणींमुळे सर्वसामान्य मतदार निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज भरू शकत नाहीय. अनेक मतदारांची नावे कोणत्याही विधानसभा क्षेत्र मध्ये समाविष्ट नसल्यावर सुद्धा आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे म्हणून नाकारले जात असल्याने भुसावळ शिवसेना शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तहसीलदार दीपक धिवरे यांची भेट घेतली.प्रसंगी तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, उपशहर संघटक नबी पटेल, संदीप ठाकूर, राहुल सावकारे, हितेश भोई, सचिन चौधरी, हर्षल सोनवणे उपस्थित होते.ऑनलाइन अर्ज भरताना वयाचे घोषणापत्र प्रिंटआऊट काढून सही करून परत अपलोड करायचे आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचा अर्थ उरत नाही तसेच इतर ठिकाणाहून होणाऱ्या नोंदणीमुळे मतदारांचा महत्त्वपूर्ण माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे बबलू बऱ्हाटे म्हणाले.भुसावळ मतदार संघातील मतदार यादी पडताळणी प्रक्रिया अचूक व गुणवत्ता पूर्वक राबविणे, मतदार माहितीची नोंदणी प्रक्रिया ही वेळोवेळी अद्यावत करणे आवश्यक आहे. मतदार ओळखपत्रावरील मतदारांची नावे, वय, लिंग, फोटो इ. मध्ये विसंगती तसेच दुहेरी मतदार नोंदणी शोधून ते अद्यावत करणे, मृत्यूपावलेल्या मतदारांची नावे मतदान यादीतून वगळणे व इतर संबंधितकामे करताना मतदान नोंदणी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन यादी निदोष करण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.



