भुसावळ –
पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांचा दोन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आता उपनगराध्यक्षपदाची संधी सोनी संतोष बारसे यांना मिळणार आहे. नेमाडे यांना संधी मिळाल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी 27 जून रोजी संपला आहे.
बारसे यांच्या माध्यमातून समाजाला प्रथमच संधी
सत्ताधारी गटाच्या नियोजनानुसार अखेरच्या वर्षात पहिल्या दोन महिन्यांसाठी ज्येष्ठ नगरसेवक रमेश नागराणी यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली व त्यानंतर प्रमोद नेमाडे यांच्याकडे जबाबदारी आली. त्यांचाही कार्यकाळ 27 जून रोजी संपला असून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील टप्प्यात सोनी संतोष बारसे यांना उपनगराध्यक्ष पद देण्यात येणार आहे. यापूर्वी मेहतर वाल्मिकी समाजाला एकदाही नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली नाही त्यामुळे बारसे यांच्या माध्यमातून प्रथमच ही संधी मिळेल. यानंतर पुढील टप्प्यात ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली जाणार आहे. भाजप सत्ताधार्यांमध्ये यापूर्वी ठरल्यानुसार भाजपचे नगरसेवक निर्मल कोठारी यांना शेवटच्या संपूर्ण वर्षभरासाठी उपनगराध्यक्ष पद मिळणे अपेक्षित होते. मात्र ऐनवेळी पाच जणांना संधीचा निर्णय झाला त्यामुळे कोठारी यांना केवळ दोन महिने पद मिळणार असल्याने त्यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला.



