माजी आमदार संतोष चौधरींच्या जामिनावर 1 जुलैला अंतीम निर्णय –


भुसावळ (प्रतिनिधी )-

भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात या प्रकरणी सुरूवातीला 22 व 24 जून रोजी सुनावणी झाल्यानंतर 30 रोजी पुन्हा दोन्ही बाजूने युक्तीवाद झाल्यानंतर न्या.संजय भन्साली यांनी जामिनावर 1 जुलै रोजी अंतीम निर्णय देण्यात येईल, असे सांगितले. 1 रोजी न्यायालय नेमका काय निर्णय देते? याकडे आता लक्ष लागले आहे.
भुसावळातील सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे सोमवार, 14 रोजी अधिकार्‍यांसह गेले असता माजी आमदार संतोष चौधरी यांनी तेथे आल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी यांनी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर 22 पर्यंत त्यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवार, 22 रोजी न्या.संजय भन्साली यांच्या न्यायासनापुढे जामीन अर्जावर सुनावणी झाली. याप्रसंगी बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या ‘से’ मध्ये चौधरी यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांसह मुख्याधिकार्‍यांविरोधात दाखल गुन्ह्याची माहिती देण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपींच्या वकीलाला दाखल गुन्ह्याबाबत म्हणणे मांडण्याचे निर्देश देत 24 जून रोजी सुनावणी ठेवली होती तर गुरुवार, 24 जून रोजी सरकारी पक्षातर्फे तसेच चौधरी यांच्या वकीलांनी न्यायालयात काही कागदपत्रे सादर केली त्यानंतर 30 जून रोजी पुन्हा दोघा पक्षांच्या वतीने युक्तीवाद करण्यात आल्यानंतर न्या.भन्साली यांनी जामिनावर 1 जुलै रोजी अंतीम निर्णय देणार असल्याचे सांगितले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे तर चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *