जळगाव –
पत्रकाराची चारचाकी अडवत त्यास मारहाण करून लुटण्याची आल्याची घटना शहरात गुरुवारी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पिस्टलासह शस्त्र जप्त केले आहेत. रोहन उर्फ रॉनी मधूकर सपकाळे (रा.दांडेकर नगर, पिंप्राळा), अनिकेत मधूकर सपकाळे (रा.दांडेकर नगर) व सतीश रवींद्र चव्हाण (रा. ओम शांतीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून गावठी पिस्टल, चॉपर तसेच चाकू व लुटीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे.
वायरल न्यूज लाईव्हचे पत्रकार आतिक बिलाल खान (47, रा. मुक्ताईनगर) हे धुळे येथून परतत असताना गुरूवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास जळगाव विद्यापीठ ते गुजराल पेट्रोल पंपाच्या मध्ये त्यांच्या स्विफ्ट गाडी (एम.एच.18.डब्ल्यू 6885) ला मागून ओव्हरटेक करून प्रत्येकी डबलसीट असणार्या दोघा दुचाकीस्वारांनी अडवले व लाथा बुक्क्यांनी तोंडावर, छातीवर मारा करत त्यांच्या खिशातील 600 रुपये रोख व एक पेन हिसकावून घेत पळ काढला. आतीक बिलाल खान यांनी मुक्ताईनगरात फिर्याद नोंदवल्यानंतर ती तालुका पोलिसात वर्ग करण्यात आली. तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अवघ्या चार तासात संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार, सतिष हाळणोर, वासूदेव मराठे, विजय दुसाने, ललित पाटील, प्रवीण हिवराळे, सुशील पाटील, अनिल मोरे, दीपक कोळी, दीपक राव आदींनी ही कारवाई केली आहे.



