रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या वाटेतच उतरवले; एसटी चालक-वाहकाचा संतापजनक प्रकार!भंडाऱ्यातील रोहा गावातील घटना; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पालकांमध्ये संताप

भंडारा : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात त्यांच्या नियोजित गावापर्यंत न पोहोचवता अर्ध्या वाटेतच उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील रोहा येथे समोर आला आहे. बसमध्ये इतर प्रवासी नसल्याचे कारण देत चालक आणि वाहकाने दोन्ही विद्यार्थिनींना वाटेतच उतरवले. या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भंडारा ते मुंढरी या मार्गावर धावणारी एसटी बस (क्रमांक एमएच ४० वाय ५००८) रात्री रोहा गावात पोहोचली. त्यावेळी बसमधील इतर प्रवासी आधीच उतरले होते. बसमध्ये केवळ दोन विद्यार्थिनी शिल्लक होत्या. या दोघींना पुढे मुंढरी येथे जायचे होते. मात्र, बसमध्ये अन्य प्रवासी नसल्याचे कारण देत चालक आणि वाहकाने त्यांना रात्रीच्या अंधारात रोहा गावातच खाली उतरवले.
या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून तातडीने रोहा येथे धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित चालक आणि वाहकाला जाब विचारला. तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
ईश्वरकर यांच्या तत्परतेमुळे विद्यार्थिनींच्या मदतीसाठी तातडीने हालचाल झाली. मात्र, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवासाची अपेक्षा ठेवणाऱ्या विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी अर्ध्या रस्त्यात उतरवणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
बस रिकामी असल्याचे कारण देऊन दोन विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात अनोळखी ठिकाणी उतरवण्याचा निर्णय चालक आणि वाहकाने कसा घेतला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना नियोजित गावापर्यंत पोहोचवणे किंवा सुरक्षित पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, या घटनेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
एसटी महामंडळाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित चालक व वाहकाची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासाबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.