आर्या फाउंडेशनतर्फे ‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट अभियान २०२६’चे आयोजन ; भुसावळमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; ३३ सामाजिक संस्था व माध्यम प्रतिनिधींचा सन्मान ;

भुसावळ (प्रतिनिधी) : आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनतर्फे ‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट अभियान २०२६’ अंतर्गत लोणारी समाज मंगल कार्यालय, भुसावळ येथे व्यसनमुक्ती जनजागृती व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना उमेंद्र वाघचौरे आणि अध्यक्ष उमेंद्र वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थी व युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि व्यसनमुक्त युवक, व्यसनमुक्त कुटुंब व व्यसनमुक्त समाजाचा संदेश जनमानसात पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.

चित्रकला व रील स्पर्धेतून व्यसनमुक्तीचा संदेश

अभियानांतर्गत इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचाही सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित रील स्पर्धेत युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभम नालेकर, द्वितीय क्रमांक अमन शेख आणि तृतीय क्रमांक शेहझान शेख यांनी मिळविला. सर्वाधिक ऊर्जावान व प्रभावी रीलसाठी सरफराज शेख याला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पथनाट्याद्वारे जनजागृती

कार्यक्रमात स्वराज्य पथनाट्य संस्था, पर्यावरण जागर संघटना आणि ब्रह्मकुमारी संस्थेच्या टीमने व्यसनमुक्ती विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. नशेच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन या सादरीकरणातून करण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर आणि भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच प्रतिष्ठा महिला संस्थेच्या संस्थापिका रजनीताई सावकारे, भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, वर्षाताई तल्लारे, शमीभाताई पाटील आणि तंबाखूमुक्त परिसराचे ब्रँड अॅम्बेसेडर राज मोहम्मद यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी ट्रॉमा केअर सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख, गोल्डन आर हॉस्पिटलचे संचालक डॉ. शंतनू साहू, विकास मकदूम, सचिन माने, डॉ. रजनी बडगुजर, अरुणोदय फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण तायडे, लता तायडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

३३ सामाजिक संस्था व माध्यम प्रतिनिधींचा गौरव

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३३ सामाजिक संस्था व संघटनांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या विविध न्यूज चॅनेल्सचे संपादक, संचालक आणि माध्यम प्रतिनिधींचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना उमेंद्र वाघचौरे यांचा पोलीस सहकार्य समिती तसेच वर्षाताई तल्लारे यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल डॉ. वाघचौरे यांनी पोलीस सहकार्य समिती, वर्षाताई तल्लारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे फाउंडेशनच्या वतीने आभार मानले.

आयोजनासाठी टीमचे योगदान

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्या फाउंडेशनच्या प्रशासकीय प्रमुख अंजुम खान यांनी विद्यार्थी व यूथ टीमच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक व व्याख्याते कमलेश सोनवणे यांनी केले. अध्ययन कौशल्य विकास महाविद्यालयाच्या व्याख्याता मनीषा सुनील बाविस्कर यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी उपस्थित मान्यवर, सामाजिक संस्था, शाळांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, माध्यम प्रतिनिधी, पथनाट्य सादर करणाऱ्या संस्था आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट अभियान २०२६’च्या माध्यमातून आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनने व्यसनमुक्तीचा संदेश युवकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव केला. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती, युवकांचा सहभाग आणि विविध संस्थांमधील समन्वय महत्त्वाचा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.