भुसावळ, ता. ६ (प्रतिनिधी )-: वारली चित्रकलेतून ग्रामीण जीवन, संस्कृती, परंपरा आणि आदिवासी जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडते. आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात. अशा परिस्थितीत काही वेळ पारंपरिक कला शिकण्यासाठी देणे महत्त्वाचे आहे. वारली चित्रकलेच्या माध्यमातून आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि परंपरा समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा प्रशिक्षण शिबिरांचे नियमित आयोजन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने भुसावळ येथील ब्राह्मण संघात १ ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनी सावकारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, सचिव महेंद्र गोडबोले, रागिणी संगीत कला महाविद्यालय, बऱ्हाणपूरचे प्राचार्य डॉ. सतीश वर्मा तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे कार्यक्रम अधिकारी विवेक श्रीरामे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातून शिबिराचे मार्गदर्शक वारली चित्रकार रमाकांत भालेराव यांनी प्रशिक्षणा दरम्यान देण्यात आलेल्या विविध माहिती व कलाप्रकारांचा आढावा घेतला. शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे भास्कर नारखेडे व राजश्री देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अनिल पाटील, जळगाव तसेच रेवती मांडे यांनी शिबिराबाबत मनोगत व्यक्त करून अशा प्रकारची शिबिरे ठराविक कालावधीनंतर नियमितपणे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सर्व शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच वारली चित्रकार रमाकांत भालेराव यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन शिबिरार्थी व उपस्थितांच्या अवलोकनासाठी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी चारू भालेराव, हेमांगी पडागरे, श्रीकांत पवार, नुपूर भालेराव, अशोक पाटील, माहूरकर, भास्कर नारखेडे व सोनल भिरुड यांनी परिश्रम घेतले.



