दुष्काळाचे आव्हान स्वीकारा, गावागावांत रचनात्मक काम उभारा; स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ता अभ्यास वर्ग

रवींद्र भुसारी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; राजेंद्र नन्नवरे यांनी मांडली जलसंकटाची गंभीरता

भुसावळ/फैजपूर, ३ ऑक्टोबर (प्रतिनिधी)-:

माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथील शुभ दिव्य लॉन येथे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले. दुष्काळाची सद्यस्थिती, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागातून गावपातळीवर रचनात्मक काम उभे करण्याबाबत यावेळी विचारमंथन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे माजी संघटनमंत्री रवींद्र भुसारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे आणि फैजपूर शहराध्यक्ष चंद्रकांत जाधव उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल पाटील आणि सुरेश धनके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन के.जी.पाटील यांनी केले.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे माजी संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी कार्यकर्त्यांची भूमिका आणि स्व. हरिभाऊ जावळे यांच्या कार्याचा वारसा यावर मार्गदर्शन केले. “कार्यकर्ता हा शोपीस नाही, तर कार्यकर्त्याचा पोथ उच्चस्तरीय असतो. जसा कार्यकर्ता असतो, तसा पक्ष असतो. आजही आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या रूपाने हरिभाऊ जिवंत आहेत,” असे ते म्हणाले.

स्व. हरिभाऊ जावळे यांनी आमदार, खासदार आणि विविध राजकीय पदांवर काम केले असले तरी त्यांची मूळ ओळख कार्यकर्त्याची होती. स्वयंसेवकाचा स्वभाव त्यांनी आयुष्यभर जपला. शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी विविध प्रकल्प व योजना राबविल्या. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरिभाऊंची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची दिशा आमदार अमोल जावळे यांच्या कार्यातून पुढे जात असल्याचे भुसारी यांनी नमूद केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जलसंकटाची गंभीरता अधोरेखित

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी रावेर-यावल परिसरातील जलसंकटाची गंभीरता मांडली. भूजलाचा वाढता उपसा, अपुरे पुनर्भरण आणि पावसातील अनिश्चितता यामुळे जलव्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ शासनाच्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारणाची रचनात्मक चळवळ उभी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नन्नवरे यांनी नागपूर जिल्ह्यातील अरोली-मौदा येथील सामूहिक शेतीचा प्रयोग, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, बारीपाडाचे चैत्राम पवार, राहीबाई पोपरे यांची बीजबँक तसेच मियावाकी घनवन प्रकल्प यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या प्रयोगांपासून प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात दुष्काळ, जलसंधारण, पर्यावरण आणि शेतीशी संबंधित रचनात्मक उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळावर मात करण्यासाठी जाणीव, लोकसहभाग आणि प्रत्यक्ष कृती या त्रिसूत्रीवर गावपातळीवर काम उभे करण्याची दिशा या अभ्यास वर्गातून देण्यात आली.

यावेळी माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, आमदार अमोल जावळे, विधानपरिषद सदस्य नंदकिशोर महाजन, यांच्यासह रावेर-यावल तालुक्यातील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.