भुसावळच्या रेल्वे इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये होणार गणपती बाप्पाची स्थापना;सर्वधर्म समभावाचे दर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये कामगार मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी शेडचे मुख्य अभियंता सिरीन संचय यांच्या हस्ते गणपती बाप्पाची विधीवत स्थापना करण्यात येणार आहे.हा गणेशोत्सव पाच दिवसांचा असणार आहे. उत्सव काळात शेडमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी नित्य नियमाने गणपतीची पूजा व आरती केली जाते. या आरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मांचे रेल्वे कामगार एकत्र येऊन बाप्पाच्या आरतीला उपस्थित राहतात, जे या शेडमधील सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाचे अनोखे दर्शन घडवते.पाच दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर, पाचव्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन तापी नदीच्या पात्रात केले जाते, अशी माहिती शेडचे कर्मचाऱ्यांनी दिली. या उत्सवासाठी कामगार मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि रेल्वे कर्मचारी जय्यत तयारी करत आहेत.