भुसावळ (प्रतिनिधी) – गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये विविध ठिकाणी शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्वहस्ते गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद मिळावा, या उद्देशाने सक्षम नारी फाउंडेशनतर्फे साकेगाव येथील इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये शनिवारी (दि. १२) पर्यावरणपूरक शाडूमाती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांना अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी कमी मिळते. तसेच पालकांना रोजगाराच्या कारणामुळे मुलांना शहरात आणणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सक्षम नारी फाउंडेशनने थेट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविला. या कार्यशाळेसाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून प्रशिक्षित व सुप्रसिद्ध मूर्तिकार दिनेश कोणजे तसेच त्यांचे सहकारी हेमंत मोरे यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक देत मार्गदर्शन केले. शाडूमातीचा वापर, मूर्तीची रचना, आकारमान तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने आपल्या हातांनी सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. स्वतःच्या हाताने घडविलेला बाप्पा पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे, कार्यशाळेत तयार केलेल्या याच गणेशमूर्तींची आपल्या घरी स्थापना करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची प्रेरणा देतानाच त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून दिल्याने या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. उत्कृष्ट व कल्पक गणेशमूर्ती साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्षम नारी फाउंडेशनतर्फे पारितोषिक देण्यात येणार असून, कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देण्याचे जाहीर करण्यात आले. हा पर्यावरणपूरक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ सुनिता जोशी, डॉ. सुवर्णा गाडेकर, शीतल भालेराव आणि संगिता जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास इंदिरा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.



