पंजाबराव डख यांच्या पावसाच्या अंदाजाला दुजोरा -महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन; निसर्गाच्या अभ्यासातून हवामानाचा वेध घेणाऱ्या शेतकरी अभ्यासकाचे प्रा. जतीन मेढे यांच्याकडून कौतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यात संपूर्ण श्रावण महिना तुलनेने कोरडा गेल्याने अनेक भागांत शेतातील पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाचे पुढील अंदाज स्पष्ट नसल्याने शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेला वर्ग चिंतेत होता. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी आणि स्वअभ्यासातून हवामानाचा अंदाज मांडणारे अभ्यासक पंजाबराव डख यांनी आठ दिवसांपूर्वी १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केला होता.

११ सप्टेंबर रोजी दुपारपासून जळगाव जिल्ह्यासह भुसावळ परिसरात तसेच महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने डख यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाला सुरुवात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या हवामान अभ्यासाची आणि निसर्ग निरीक्षणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

पंजाबराव डख यांनी आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून निसर्ग, पर्यावरण, आकाशातील बदल, माती आणि पर्जन्यमान यांचा अभ्यास केला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी म्हणून प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्यांनी विविध नैसर्गिक संकेतांचे निरीक्षण केले. औपचारिक विद्यापीठीय शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष अनुभव, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि स्वअभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी हवामानाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रा. जतीन मेढे यांनी नमूद केले.

अभ्यासकांच्या ज्ञानाचा शासनाने उपयोग करून घ्यावा

हवामानासंदर्भात साचेबद्ध पद्धतीने होणाऱ्या अभ्यासासोबतच प्रत्यक्ष शेतात, ग्रामीण भागात आणि निसर्गाच्या सान्निध्यातून मिळणाऱ्या अनुभवाधारित ज्ञानालाही महत्त्व देणे गरजेचे आहे. अशा अभ्यासकांच्या अनुभवाचा शासन-प्रशासनाने राज्याच्या कृषी आणि ग्रामीण विकासासाठी उपयोग करून घ्यावा, अशी अपेक्षाही प्रा. मेढे यांनी व्यक्त केली.

विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष अनुभव आणि सातत्यपूर्ण अभ्यासातून ज्ञान मिळविणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या धोरणनिर्मितीत सहभागी करून घेतल्यास त्याचा फायदा समाजाला होऊ शकतो. विधान परिषदेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अभ्यासक व तज्ज्ञांना लोकप्रतिनिधित्वाची संधी देण्यामागील घटनात्मक संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर पंजाबराव डख यांच्यासारख्या अभ्यासकांच्या ज्ञानाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी व्हावा, असेही त्यांनी म्हटले.

‘भविष्यवाणी’ नव्हे, तर दीर्घ अभ्यासातून आलेला अंदाज

“पंजाबराव डख यांनी पावसाची भविष्यवाणी केली,” असे म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक वर्षांच्या निसर्ग, पर्यावरण आणि हवामानाच्या अभ्यासातून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, असे प्रा. जतीन मेढे यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर महिन्यातील पावसाबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाला ११ सप्टेंबरपासून झालेल्या पावसाने दुजोरा मिळण्यास सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागात राहून शेतीमातीचा आणि निसर्गाचा सातत्याने अभ्यास करणाऱ्या पंजाबराव डख यांच्यातील या अभ्यासू वृत्तीचा अभिमान वाटतो. त्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाचा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या हितासाठी अधिक व्यापक पद्धतीने उपयोग व्हावा, अशी अपेक्षा प्रा. मेढे यांनी व्यक्त केली.

– प्रा. जतीन श्री. मेढे
९५४५०- ७२६००