भुसावळ (प्रतिनिधी) – श्रावण अमावस्येला साजरा होणारा पोळा हा शेतकरी आणि सर्जा राजा अर्थात बैल यांच्यातील अतूट नात्याची तसेच कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा महत्त्वपूर्ण सण आहे. अन्नधान्य निर्मितीसाठी शेतकऱ्यासोबत शेतात अहोरात्र श्रम करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पोळ्यानिमित्त बांध-बंदिस्ती कायम ठेवून त्यावर वृक्षलागवड करण्यासोबतच बांधावरील गवत व चराई क्षेत्र रासायनिक फवारणीमुक्त ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आधुनिक जीवनात वाहन, मोबाईल आदी साधनांशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पना करणे कठीण आहे, त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांसाठी बैलांशिवाय शेती करणे अवघड आहे. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतात. पावसाळ्यात शेतातील बांध-बंदाऱ्यांवर नैसर्गिकरित्या उगवणारे हिरवे गवत हे सर्जा राजाचे आवडते खाद्य असून ते त्यांच्यासाठी ‘निसर्गनिर्मित अमृतखाद्य’ आहे. हे गवत कापल्यानंतर पुन्हा उगवते. त्याचबरोबर बांधावरील गवत जमिनीची धूप रोखून माती धरून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. त्यामुळे शेतीसोबत पर्यावरणाच्या दृष्टीनेही बांधावरील गवताचे संवर्धन आवश्यक आहे. मात्र शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांध काढणे तसेच बांधावरील गवतावर रासायनिक फवारणी करणे यामुळे सर्जा राजाचे नैसर्गिक खाद्य नष्ट होत आहे. तसेच शेतात बैलांना विसावा घेण्यासाठी सावली देणारी झाडेही कमी होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी बांध कायम ठेवून त्यावर पर्यावरणपूरक स्थानिक वृक्ष व फळझाडांची लागवड करावी. तसेच बांध आणि चराई क्षेत्रात रासायनिक फवारणी टाळून नैसर्गिक गवताचे संवर्धन करावे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. पोळा हा केवळ बैलांची पूजा करण्याचा सण न राहता सर्जा राजाचे नैसर्गिक खाद्य, सावली आणि पर्यावरण यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्याचा दिवस ठरावा, अशी अपेक्षाही डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केली.


