गणेश चतुर्थीनिमित्त भुसावळ विभागातील पीआरएस केंद्रांच्या कार्य वेळेत बदल

१४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आरक्षण काउंटर सुरू; त्यानंतर वेळेत बदल

भुसावळ (प्रतिनिधी) – गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांच्या कार्य वेळेत सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी बदल करण्यात आला आहे.

या बदलानुसार भुसावळ विभागातील सर्व पीआरएस आरक्षित तिकीट बुकिंग काउंटर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत पीआरएस केंद्रांवरील नियमित आरक्षण काउंटर बंद राहतील.

मात्र, प्रवाशांची सुविधा तसेच आपत्कालीन गरजा लक्षात घेऊन पुरेशा संख्येने पीआरएस काउंटर आपत्कालीन कामकाजासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे आवश्यक आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

प्रवाशांनी १४ सप्टेंबर रोजी आरक्षणाशी संबंधित कामासाठी पीआरएस केंद्रांच्या निर्धारित कार्य वेळेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे व आरक्षणाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.