रावेर (प्रतिनिधी) : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक उभी पिके वाचविण्यासाठी ‘कृत्रिम पाऊस’ (Cloud Seeding) पाडण्याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर्षी रावेर व यावल तालुक्यासह परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प व अनियमित राहिल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्याने केळी, कापूस, मका, सोयाबीन यांसह विविध पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी उभी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. तसेच भूजल पातळी खालावत असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी शासनाने उपलब्ध तांत्रिक पर्यायांचा तातडीने विचार करणे गरजेचे आहे. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह लगतच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याची (Cloud Seeding) शक्यता तपासून त्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार जावळे यांनी केली आहे. शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही आमदार अमोलभाऊ जावळे यांनी व्यक्त केली. या उपाययोजनेचा तांत्रिकदृष्ट्या सकारात्मक अहवाल आल्यास पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळून उभी पिके वाचविण्यास मदत होऊ शकते.


