भुसावळ, (प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेपेक्षा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पदे जास्त होत असल्याने काही पदे नागरिकांचा मागास प्रवर्गातून सर्वसाधारण प्रवर्गाकडे देय होत आहेत. त्यानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सोडत सभा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार भुसावळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तळवेल ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण थेट देण्यात आले. उर्वरित पात्र ग्रामपंचायती वराडसिम, मन्यारखेडे, शिंदी, वेल्हाळे, कंडारी व ओझरखेडा या सहा ग्रामपंचायतींमधून तीन चिठ्ठ्या काढण्यात आल्या. बालक शिव आकाश कोळी (वय ६ वर्षे) यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या चिठ्ठ्यांमध्ये वराडसिम, मन्यारखेडे आणि ओझरखेडा या ग्रामपंचायतींची निवड झाली. त्यामुळे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तळवेल, वराडसिम, मन्यारखेडे आणि ओझरखेडा या चार ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० ग्रामपंचायती आरक्षित भुसावळ तालुक्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण २० ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. त्यामध्ये काहुरखेडा-मानपुर, पिंप्रीसेकम निंभोरा बु., सुसरी, जोगलखेडा-भानखेडा, सुनसगाव गोंभी, गोजोरा, मोंढाळे, पिंपळगाव बु., साकेगाव, मांडवेदिगर-भिलमळी, अंजनसोंडे, कन्हाळे खु., बोहडर्डी बु.-बोहडर्डी खु., बेलव्हाळ, जाडगाव, कठोरे बु., कठोरे खु., शिंदी, वेल्हाळे आणि कंडारी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. महिला आरक्षणाची सोडत ८ सप्टेंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची सोडत सभा मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता ताप्ती सभागृह, भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस संबंधित गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार निता लबडे यांनी केले आहे.



