भुसावळ प्रतिनिधी : भगवान श्री जाहरवीर गोगा देवजी यांच्या गोगानवमी उत्सवानिमित्त भुसावळ शहरात आज, ६ सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात भव्य उत्सव साजरा होणार आहे. शहरातील विविध भागांतून तब्बल १३ भव्य छडी मिरवणुका काढण्यात येणार असून, सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत पारंपरिक छडी मिरवणुकांचा सोहळा रंगणार आहे. उत्सवानिमित्त सकाळी उत्सव समितीच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी ९ वाजता नाहाटा चौक येथून सुरू होणार आहे. जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज, दगडी पूल, सरदार वल्लभभाई पुतळा, जळगाव रोड, महात्मा गांधी पुतळा, शहर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन मार्गे रॅली पुढे जाऊन वाल्मीक चौक येथे तिचा समारोप होणार आहे. वाल्मीक चौकातून छडी मिरवणुकीला प्रारंभ सायंकाळी निघणारी पवित्र छडी मिरवणूक वाल्मीक नगरसमोरील चौकातून सुरू होऊन पांडुरंग टॉकीज, मार्गे बाजारपेठ पोलीस ठाणे, जामनेर रोड, मोटूमल शोभराज चौक, ब्राह्मण संघ, अण्णा भाऊ साठे स्मारक मार्गे मिरवणूक वाल्मीक चौकात पोहोचेल. त्यानंतर नेहरू मैदानावर मिरवणुकीचा समारोप होऊन महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना मेहतर वाल्मीक समाजाचे अध्यक्ष मिथुन बारसे यांनी सांगितले की, यावर्षी प्रशासनाकडून मिरवणुकीसाठी रात्री १२ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे समाजाच्या वतीने त्यांनी आभार मानले. समाजबांधवांमध्ये उत्साह भगवान श्री जाहरवीर गोगा देवजी हे समाजाचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी गोगानवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाही शहरातील समाजबांधव एकत्र येत भक्तिभावाने हा धार्मिक सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मोटारसायकल रॅलीनंतर सायंकाळी होणाऱ्या भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत. यावेळी मिथुन बारसे, गणेश बारसे, गब्बर चावरिया, अजय डांगोर, समिती अध्यक्ष नितीन करोसीया, उपाध्यक्ष करण लख्खन, अमित खरारे, कपिल ढीक्याव, बबलू डांगोर, सुनील पवार यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. मिरवणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त.... मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विभागीय पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावर वाहतुकीचे नियमनही करण्यात येणार आहे.


