नागपूर-भुसावळ विभागातील खासदारांसोबत मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची बैठक ; स्थानक पुनर्विकास, रेल्वे मार्गिका व नव्या गाड्यांसह प्रवासी सुविधांबाबत विविध मागण्यांवर चर्चा ;

नागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांनी नागपूर व भुसावळ विभागातील प्रमुख रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत दोन्ही विभागांच्या खासदारांची बैठक घेतली. २ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील ‘समाधान’ कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक पार पडली.

बैठकीस रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, वर्ध्याचे अमर काळे, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर, बैतूलचे दुर्गादास उईके, छिंदवाड्याचे बंटी विवेक साहू, दिंडोरीचे भास्कर मुरलीधर भगारे, जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ, अकोल्याचे अनुप संजय धोत्रे, अमरावतीचे बळवंत बसवंत वानखेडे, खंडव्याचे ज्ञानेश्वर पाटील तसेच राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी सहभाग घेतला.

बैठकीच्या प्रारंभी महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांनी उपस्थित खासदारांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या विविध कामगिरीचा आढावा घेतला. उप-महाव्यवस्थापक श्री. के. के. मिश्रा यांनी बैठकीचे कामकाज पाहिले.

नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. विनायक गर्ग आणि भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनीत अग्रवाल यांनी आपापल्या विभागाच्या कामगिरीचे सविस्तर सादरीकरण केले.

यानंतर खासदारांनी आपल्या मतदारसंघातील रेल्वे सुविधांशी संबंधित विविध मागण्या व सूचना मांडल्या. स्थानकांचा पुनर्विकास, तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका, अमृत भारत स्थानक योजना, वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस तसेच विशेष गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.

मध्य रेल्वेकडून सुरू असलेल्या विविध विकासकामांचे व प्रवासी सुविधांमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणांचे खासदारांनी कौतुक केले. बैठकीत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना रेल्वे प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली. तसेच प्रवाशांच्या सुविधा आणि रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी खासदारांनी मांडलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले.