भुसावळ (प्रतिनिधी) - सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, ऑनलाइन गेम्स, सोशल मीडिया, रिल्स तसेच यूपीआयच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, डिजिटल सुविधांचा वापर करताना होणाऱ्या छोट्या-छोट्या चुका सायबर फसवणुकीस कारणीभूत ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील श्रीमती प. क. कोटेचा माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अॅड. रमेश पांडव यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत अत्यंत सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत मार्गदर्शन केले. मोबाईलचा सुरक्षित वापर, ऑनलाइन गेम्स, सोशल मीडिया, रिल्स, यूपीआय व्यवहार, ओटीपी, पासवर्ड, अनोळखी लिंक तसेच ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून माहिती दिली. डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच ओटीपी व पासवर्ड कोणालाही सांगू नये, अशा महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देताना त्यांनी रशिया, भारत तसेच विविध राज्यांमधील सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणाचा उल्लेख केला. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आय. एस. खंडेलवाल होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक अनिल कोष्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वल्लभ कुलकर्णी यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक विश्वंभर सुरडकर, मधुकर घाटे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. संजय दुतोंडे व श्री. धनराज कोळी यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरला.


