भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, माजी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तब्बल ११ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकाचवेळी ११ नगरसेवकांनी शिंदे गटात वाट धरल्याने भुसावळच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, नगरपरिषदेतील विद्यमान राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांना गती देणे, शासन स्तरावर अधिक चांगला समन्वय साधणे आणि भुसावळच्या विकासासाठी सत्तापक्षासोबत एकत्रितपणे काम करण्याच्या उद्देशाने हा राजकीय निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या राजकीय प्रवेशामुळे एकाच रात्रीतून शिवसेना शिंदे गटाची नगरपरिषद स्तरावरील ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मा . अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एकाचवेळी ११ नगरसेवकांनी हाती धनुष्यबाण घेतल्याने मात्र आगामी काळात नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे तसेच विरोधकांची रणनीती यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असून धनुष्यबाणा तीर नेमका कोणाच्या वर्मावर वार करणार हे आगामी काळच ठरवणार....! शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये सचिन संतोष चौधरी, अकील नादर पिंजारी, आमीन कुरेशी, सचिन पाटील, धोनी मेम्बर, नदीम सरकार, उल्हास पगारे, सिकंदर खान, सुभद्रा गुंजाळ, (मुकेश गुंजाळ आई) , इकबाल पहलवान आणि पुष्पा कैलास चौधरी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच अन्य कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती आहे. दरम्यान, या राजकीय घडामोडीमुळे भुसावळ नगरपरिषदेच्या राजकारणात आगामी काळात कोणता गट अधिक मजबूत होणार, कोणती नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार आणि त्याचा शहरातील विकासकामांवर नेमका किती परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोठ्या राजकीय उलटफेरानंतर येत्या काळात आणखी काही नगरसेवक किंवा प्रमुख कार्यकर्ते कोणत्या गटात प्रवेश करतात का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनिल छबिलदास चौधरी, गायत्री भंगाळे आणि राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणाचे वातावरण चांगलेच तापले असून, या घडामोडींचे आगामी काळात नगरपरिषद राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


