भुसावळ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असताना भुसावळ शहरातही शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भव्य तिरंगा ध्वजाने रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहराचा परिसर दणाणून गेला. भाजप भुसावळ विधानसभा क्षेत्राच्या वतीने सकाळी ९ वाजता जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिराजवळून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर पी.ओ. नाहाटा महाविद्यालयाजवळील शहीद राकेश शिंदे स्मारकाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच प्रतिष्ठा महिला मंडळासह विविध महिला मंडळांच्या महिला भगिनी, बियाणी स्कूल, ताप्ती पब्लिक स्कूल, म्युनिसिपल हायस्कूल यांसह विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी भारतमातेचा जयघोष करत देशभक्तीचा संदेश दिला. ‘एक तिरंगा, एक भारत, एक भावना’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीमुळे भुसावळ शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी ही रॅली शहरवासीयांसाठी विशेष आकर्षण ठरली.


