चोपडा तालुक्यात अंत्यंत हृदयद्रावक घटना: आईच्या कुशीतून 2 महिन्यांच्या बालिकेला हिंस्र प्राण्याने नेले

चोपडा – चोपडा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मामलदे शिवारात रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या बालिकेला अज्ञात हिंस्र प्राण्याने उचलून नेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काठेवाडी गायींसह फिरणारे एक राजस्थानी कुटुंब मामलदे परिसरातील शेतात मुक्कामी थांबले होते. रात्री आई आपल्या चिमुरडीला कुशीत घेऊन झोपली होती. मात्र पहाटेच्या सुमारास बाळ कुशीत नसल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरडा केला.

यानंतर कुटुंबीयांनी तातडीने परिसरात शोधमोहीम सुरू केली. काही अंतरावर बाळाचे हाडामासाचे अवशेष आढळून आल्याने अज्ञात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याचा संशय अधिक बळावला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून नेमक्या कोणत्या प्राण्याने हल्ला केला, याचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच वनविभागालाही याबाबत माहिती देण्यात आली असून संबंधित प्राण्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना रात्री उघड्यावर झोपणे टाळण्याचे, तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


!