जळगाव तालुक्यात ५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका तसेच एका ग्रामपंचायतीत थेट सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या संदर्भातील अधिसूचना ३० मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.

तालुक्यातील वसंतवाडी (प्रभाग क्र. २), जळके (प्रभाग क्र. १), करंज (प्रभाग क्र. ३), किनोद (प्रभाग क्र. १) आणि विटनेर (प्रभाग क्र. ३) या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. तसेच वराड बुद्रूक येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार ४ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. १५ एप्रिल रोजी अर्जाची छाननी, २८ एप्रिल रोजी मतदान, तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजिंक्य आंधळे, छाया कोळी, दुरगूडे आणि राजेश भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नायब तहसिलदार प्रशांत निंबोळकर आणि मदतनिस म्हणून गंगाधर सोनवणे कार्य पाहणार आहेत.

दरम्यान, या पोटनिवडणुकांमुळे तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.