साकेगावजवळ वेगवान वाहनाची धडक; पाण्याच्या शोधात आलेल्या निलगायचा मृत्यू :

भुसावळ – (प्रतिनिधी) –
साकेगावजवळील नदी परिसरात पाण्याच्या शोधासाठी आलेल्या निलगाय नराचा अज्ञात वेगवान वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रणरणत्या उन्हामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच शहरातील गोसेवक बल्लु धायडे व रोहित महाले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करून याबाबत वनविभागाला माहिती दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की निलगाय नराचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी गोसेवक रोहित महाले यांनी प्रशासनाला विनंती करत सांगितले की, उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगल परिसरात पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रस्त्यालगत व मानवी वस्तीजवळ येत आहेत. अशा परिस्थितीत वनपरिसरात पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये.

तसेच रस्त्यांवर वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. “आज पाण्याच्या शोधात निघालेल्या निलगायला आपला जीव गमवावा लागला. प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असे आवाहन रोहित महाले यांनी केले.

दरम्यान, वनविभागाने घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे