जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न :

जळगाव (प्रतिनिधी ) : जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था, जळगाव व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० महिलांनी नावनोंदणी करून सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदार पंडित (एमबीबीएस, एमडी मेडिसिन), डॉ. प्रियंका पंडित (बी.डी.एस., कन्सल्टिंग डेंटल सर्जन व मुखरोग तज्ञ), नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, रेड स्वस्तिक सोसायटीचे सचिव डॉ. गणेश पाटील, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद आमोदकर तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनिषा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिबिरात थायरॉईड ग्रंथीचे आजार, जीवनशैली, डायबिटीस तसेच दंत व मुख आरोग्य या विषयांवर मार्गदर्शनपर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. मंदार पंडित यांनी थायरॉईडच्या आजारांची लक्षणे, योग्य आहार आणि व्यायाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. प्रियंका पंडित यांनी दंत व मुखरोगांबाबत माहिती देत त्यावरील उपाययोजना सांगितल्या. नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे यांनी महिलांना शरीरातील हाडांची झीज व हाडांचे आरोग्य कसे जपावे याविषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरात नोंदणी केलेल्या महिलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहेत. शिबिराच्या माध्यमातून सीबीसी, बीएसएल व थायरॉईड या तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात आल्या.
यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा मौर्य व रेणुका हिंगु यांना “उत्कृष्ट कार्यकर्ता” पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनिषा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन तासखेडकर यांनी केले. कार्यक्रमासाठी नेहा जगताप, संतोष जगताप आणि नाजिम शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी संस्थेच्या वंदना मंडावरे, आशा मौर्य, किमया पाटील, नीता वानखेडकर, विद्या जकातदार, शोभना मकवाना, कांचन पाटील, रेणुका हिंगु, लीना पाटील, हर्षा गुजराती, स्मिता पाटील, पूर्वी शहा आणि अर्चना पाटील यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.