भुसावळमध्ये जय मातृभूमी मंडळाची ३१०० गोवऱ्यांची पर्यावरणपूरक होळी

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील जय मातृभूमी मंडळातर्फे सोमवारी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. वृक्षतोड टाळत आणि लाकूड न जाळता मंडळाने केवळ ३ हजार १०० शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करून होळी प्रज्वलित केली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मातृभूमी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक किरण कोलते यांच्या हस्ते होळीचे पूजन व प्रदीपन करण्यात आले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीला पर्यावरणपूरक पर्याय देण्याचा प्रयत्न मंडळाने केला असून, अशा उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.