नवी दिल्ली, दि. २ मार्च — आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च) निमित्त देशभरात २५० ठिकाणी भव्य ॲथलेटिक्स लीगचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केली.

केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ASMITA (Achieving Sports Milestone by Inspiring Women Through Action) उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होणार असून, खेलो इंडिया आणि माय भारत यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
देशभरातील २५० ठिकाणी ८ मार्च रोजी एकाच वेळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील अशा तीन वयोगटांमध्ये १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा पार पडतील. या उपक्रमात एकाच दिवशी सुमारे २ लाख ५० हजार महिलांचा सहभाग अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली.
ASMITA लीगची सुरुवात २०२१ मध्ये झाली असून आजपर्यंत देशातील ५५० हून अधिक जिल्हे व ७०० शहरांमध्ये ३४ क्रीडा प्रकारांत २६०० पेक्षा अधिक लीग स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. या स्पर्धांमध्ये ३ लाखांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला असून ईशान्येकडील राज्यांसह दुर्गम भागांपर्यंत या उपक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे.
ग्रामीण व लहान शहरांतील मुलींनी क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून तो नरेंद्र मोदी यांच्या ‘नारी शक्ती’ सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. तसेच २०३० राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०३६ ऑलिंपिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर देशातील क्रीडा व्यवस्थापन क्षमता अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रातील व्यापक सहभाग वाढविण्यासाठी ASMITA लीग ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.



