भुसावळ (प्रतिनिधी) – चाळीसगाव येथे अॅड. समीर शेख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ भुसावळ शहरात शनिवारी वकिलांनी काम बंद आंदोलन केले. शहरातील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात कामकाज ठप्प ठेवण्यात आले.

बार असोसिएशन भुसावळ आणि दी लीगल प्रॅक्टिशनर्स डिस्ट्रीक्ट बार असोसिएशन भुसावळ या दोन्ही संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अॅड. शेख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, तसेच वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीशांना निवेदन देण्यात आले. न्यायालयाच्या आवाराबाहेर एकत्र येत वकिलांनी दोषींना शिक्षा देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. तसेच शनिवारी कामकाज बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकरणात वकिलांविरुद्ध अॅडव्हर्स ऑर्डर पारित करू नये, अशी विनंतीही न्यायालयास करण्यात आली.
आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील, दी लीगल प्रॅक्टिशनर्स डिस्ट्रीक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कैलास लोखंडे यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


