चाळीसगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यातील चाळीसगाव येथे न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच धक्कादायक घटना घडली. अॅड. समीर शेख यांच्यावर सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांपैकी तिघांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून उपस्थित वकील बांधवांनी तत्काळ धाव घेत हल्लेखोरांच्या तावडीतून अॅड. शेख यांची सुटका केली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी अॅड. समीर शेख यांनी प्राथमिक माहितीत प्लॉट खरेदीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला असून वकील संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे.


