भुसावळ (प्रतिनिधी) – अवधूत मल्टीपर्पज फाउंडेशन भुसावळ व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील संतश्री गजानन महाराज मंदिर, न्यू महाडा कॉलनी, दत्तनगर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिर उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संचालक श्री. रमाकांत घोडके होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका डॉ. छाया मुरलीधर फालक-देशमुख, सौ. सोनल रमाकांत महाजन, सौ. कविता ढाके, श्री. रमाकांत (बायू) महाजन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मान्यवरांचा परिचय श्री. विशाल जोशी यांनी करून दिला. सेक्रेटरी श्री. चंद्रकांत सोनोने यांनी शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन श्री. विशाल जोशी यांनी केले.
नगरसेविका डॉ. छाया फालक-देशमुख यांनी अवधूत मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. रमाकांत (बायू) महाजन यांनीही फाउंडेशनच्या कार्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिबिरात कांताई नेत्रालय, जळगाव येथील डॉ. आयुष जगताप व डॉ. अभिमन्यू पाटील यांनी सेवा दिली. त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरात एकूण ११० महिला व पुरुषांची नेत्र तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी संचालक श्री. रमाकांत घोडके, श्री. विशाल जोशी, श्री. चंद्रकांत सोनोने, श्री. रामचंद्र राणे तसेच सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले. संतश्री गजानन महाराज मंदिर देवस्थानचे श्री. मधुकर ढाके, बाळू चौधरी, गणेश वारके, निवृत्ती कोलते, गोपाल वानखेडे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. निखिल वारके यांनी आभार प्रदर्शन केले.
सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले.


