नाहाटा महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्रीपाद वाणी उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, रासेयो भुसावळ विभागीय समन्वयक प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. श्रीपाद वाणी यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या जीवनातील धाडस, जिद्द आणि पराक्रम यांचा आढावा घेतला. मराठा स्वराज्याची स्थापना, सुरतेची स्वारी, पुरंदरचा तह आणि आग्रा येथून सुटका यांसारख्या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका,” अशी शिवाजी महाराजांची ताकीद त्यांच्या रयतेबद्दलच्या अपार प्रेमाची साक्ष देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाजी महाराज हे शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुणांनी आत्मसात करून त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विलास महिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. के. राठोड यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, डॉ. डी. एन. पाटील, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. के. राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता भिरुड, प्राध्यापकवृंद, कार्यालयीन अधीक्षक श्री. भगवान तायडे, वरिष्ठ लिपिक श्री. सचिन पाटील, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.