भुसावळ शहर पोलीस व जळगाव गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई : सराईत दुचाकी चोर जेरबंद; चोरीची होंडा शाईन जप्त :


भुसावळ (प्रतिनिधी) – शहर पोलीस ठाणे आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत सराईत मोटारसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात आला असून एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी अॅड. रोकडे यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार किरण उर्फ करण शालीग्राम पाटील (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यास चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने इतरही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
तपासादरम्यान अलथान पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गुन्ह्यातील होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (क्रमांक जीजे ०५/एनए ६१८०) जप्त करण्यात आली. आरोपी हा सराईत मोटारसायकल चोर असून यापूर्वी मलकापूर पोलीस स्टेशन तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथेही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग नोंदवत प्रशंसनीय कामगिरी बजावली.