रेल्वेच्या जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा : रेल्वे प्रशासनाने केला मोठा निर्णय जाहीर :

रेल्वेच्या जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अस्वच्छता, गैरसोय आणि दुर्लक्ष यामुळे त्रासदायक ठरणारा जनरल डब्ब्यातील प्रवास आता अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होणार आहे. रेल्वे प्रशासनाने जनरल डब्यांच्या स्वच्छतेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सेवांमध्ये दर आठवड्याला तब्बल ५२ सुधारणा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. या सुधारणांचा थेट फायदा जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत नियमित स्वच्छतेवर एसी आणि स्लीपर कोचमध्येच भर दिला जात होता. मात्र आता जनरल डब्यांनाही तितक्याच प्राधान्याने स्वच्छ ठेवले जाणार आहे. जनरल डब्यातील शौचालये, वॉशबेसिन आणि कचरापेट्यांची दररोज साफसफाई केली जाणार आहे.

पूर्वी जनरल डबे इतर कोचशी आतून जोडलेले नसल्यामुळे धावत्या गाड्यांमध्ये स्वच्छता करणे कठीण जात होते. आता गाडी स्थानकावर थांबल्यानंतर कर्मचारी आरक्षित डब्यांतून उतरून थेट जनरल डब्यांमध्ये जाऊन स्वच्छतेचे काम पूर्ण करणार आहेत.

रेल्वे प्रशासन स्वच्छतेसाठी एआय तंत्रज्ञानाचाही वापर करणार आहे. स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर डब्यांचे फोटो कंट्रोल रूमला पाठवले जातील. एआय प्रणालीद्वारे त्या फोटोंचे विश्लेषण करून कामाचा दर्जा तपासला जाईल. काम निकृष्ट आढळल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

स्वच्छता कामासाठी अनुभवी कंपन्यांची निवड केली जाणार असून सुपरवायझरकडे किमान १२ वी उत्तीर्ण व आयटीआय पात्रता असणे बंधनकारक राहणार आहे.

या निर्णयामुळे जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.