अमळनेर हादरले : आरपीएफ कर्मचाऱ्याने डोक्यात झाडली गोळी

घटनेचे कारण गुलदस्त्यात : आरपीएफ कर्मचाऱ्याची मृत्यूशी 


अमळनेर  - अमळनेर रेल्वे स्थानकावर गस्तीसाठी तैनात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने सोमवार, 15 रोजी रात्री 12 वाजेनंतर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नेमक्या या घटनेचे कारण समोर आलेले नाही. एएसआय जयपाल सिंग असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.


पश्चिम रेल्वेच्या अमळनेर रेल्वे स्थानकावर एएसआय जयपाल सिंग हे सोमवारी रात्री गस्तीवर असताना रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान त्यांनी रिव्हॉल्व्हर उजव्या बाजूला कपाळावर लावत ट्रीगर दाबून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी गोळी सुटल्याने त्यांच्या कपाळातून आरपार डाव्या बाजूला निघाली.या घटनेनंतर घटनेनंतर उपस्थित सहकारी, कर्मचारी अधिकारी यांनी तत्काळ जखमी जवानाला वैद्यकीय उपचारासाठी धुळ्यात हलवल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून या घटनेचे कारण कळू शकले नाही.
या घटनेचे वृत्त कळताच नंदुरबार येथून एपीआय राहुल शेजवळ, प्रभारी अधिकारी प्रदीप सोनवणे यांनी पंचनामा केला. त्यांना भैय्या ठाकूर यांनी सहकार्य केले. मनमाड येथून फॉरेन्सिक पथक रक्ताचे नमुने तपासण्यासाठी आले. गोळी जवानांच्या कपाळातून सरळ कार्यालयाच्या भिंतीला जाऊन आदळली. तेथील व रक्ताचे नमुने गोळा करून पंचनामा करण्यात आला.

जवानाने आत्महत्येचा प्रयत्न का केला ? यामागील नेमके कारण जवानाच्या जवाबानंतरच स्पष्ट होणार आहे. कर्मचारी वेस्टर्न रेल्वे सुरक्षा बलाचा असल्याने अधिक माहिती उपलब्ध होवू शकली नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.