दिव्यांगांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचा सामाजिक उपक्रम; शिरपूर येथे १०५ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वितरण ;

सीएसआर उपक्रमांतर्गत ७१५ दिव्यांगांना ९५ लाख रुपयांचे सहाय्यक साहित्य वितरित करण्याचा संकल्प
भुसावळ (प्रतिनिधी) : ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, यंत्र इंडिया लिमिटेडचा एक घटक, तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे व साहाय्यक साधनांच्या वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

दिनांक १५ जून २०२६ रोजी शिरपूर येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजित या शिबिरामध्ये एकूण १०५ दिव्यांग लाभार्थ्यांना विविध सहाय्यक उपकरणे व साहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्यात आले.

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळच्या सीएसआर (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) उपक्रमांतर्गत एकूण ७१५ दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणे व साहाय्यक साधनांचे वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सुमारे ९५ लाख रुपयांचे मदत साहित्य वितरित करण्यात येणार असून, १५ जून ते २३ जून २०२६ या कालावधीत धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित शिबिरांद्वारे त्याचे वितरण केले जाणार आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे कार्यकारी संचालक श्री. निरंजन लाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला धुळे विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे महाव्यवस्थापक डॉ. आर. एन. झा, एलिम्कोचे व्यवस्थापक कमलेश यादव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना कार्यकारी संचालक श्री. निरंजन लाल यांनी ऑर्डनन्स फॅक्टरींच्या २०० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. भारतीय सशस्त्र दलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती देत त्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात ऑर्डनन्स फॅक्टरींच्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच दिव्यांग नागरिकांना सक्षम करण्यासाठी विशेष सहाय्यक उपकरणांचे वितरण हा सामाजिक बांधिलकीचा भाग असल्याचे सांगत, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे सामाजिक जबाबदारी सातत्याने पार पाडली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

या मदतीमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थित मान्यवर व लाभार्थ्यांनी ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ आणि यंत्र इंडिया लिमिटेडच्या मुख्यालयाने घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन तसेच धुळे येथील जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने विशेष सहकार्य केले.