ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफची तत्परता; प्रवाशाला ५१ हजार रुपये किमतीचे हरवलेले सामान सुरक्षित परत

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) प्रवाशांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाबाबतची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध करत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे हरवलेले सामान शोधून ते त्याच्या खऱ्या मालकाकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले.

दिनांक १५ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर कर्तव्य बजावत असताना सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) दीपक कव्हले यांना एका प्रवाशाने बेवारस अवस्थेत आढळलेली काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग सुपूर्द केली. सदर बॅग नियमानुसार आरपीएफ ठाण्यात आणून सीसीटीव्ही निगराणीखाली तपासण्यात आली. तपासणीदरम्यान त्यामध्ये एचपी कंपनीचा लॅपटॉप, फॉसिल कंपनीचे घड्याळ, पॉवर बँक तसेच इतर साहित्य आढळून आले.

काही वेळानंतर शुभम प्रमोदकुमार हरकूट (वय ३२ वर्षे, रा. जयराम नगर, अमरावती) हे आरपीएफ ठाण्यात दाखल झाले. त्यांनी गाडी क्रमांक १३४२५ डाउनने भुसावळ येथून अमरावतीकडे प्रवास करत असताना आपली काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर राहून गेल्याची माहिती दिली. त्यांनी बॅगेतील साहित्याचे अचूक वर्णन केले. त्यामध्ये सुमारे ३० हजार रुपये किमतीचा एचपी लॅपटॉप, २० हजार रुपये किमतीचे फॉसिल घड्याळ, एक पॉवर बँक आणि दोन चार्जर्स यांचा समावेश होता.

एएसआय दीपक कव्हले यांनी प्रवाशाच्या निवेदनाची व ओळखीची पडताळणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य त्याच्या खऱ्या मालकाकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले. आपले मौल्यवान सामान परत मिळाल्याने संबंधित प्रवाशाने रेल्वे सुरक्षा बल आणि मध्य रेल्वे प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे रेल्वे सुरक्षा बल ‘ऑपरेशन अमानत’च्या माध्यमातून हरवलेल्या वस्तू त्यांच्या खऱ्या मालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत असून प्रवाशांची सुरक्षा व सुविधा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.