जळगाव, प्रतिनिधी : राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अंतर्गत येणाऱ्या जळगाव, चाळीसगाव आणि भडगाव येथील लिपिक संवर्गातील ५० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळपासून आरटीओ कार्यालयातील अनेक सेवा खिडक्या बंद दिसून आल्या. त्यामुळे वाहनधारक, वाहनमालक तसेच विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परवाने, वाहन नोंदणी, कर भरणा, परवानगीपत्रे आदी कामांच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अधिकारी वर्गाला अतिरिक्त जबाबदारी सांभाळत नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या संपामुळे आरटीओच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामांसाठी कार्यालयात येण्यापूर्वी संबंधित माहिती घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



