भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने अवघ्या काही तासांत शोधून काढत बाजारपेठ पोलिसांनी प्रामाणिकपणा आणि तत्परतेचे उदाहरण घालून दिले आहे. भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी हे मोटारसायकलवरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना त्यांचा सुमारे एक तोळ्याचा सोन्याचा हार व ३ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंग रस्त्यात पडून हरवल्या. दागिने हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भारती काळे तसेच गुन्हे शोध पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, योगेश माळी, हर्षल पाटील, अक्षय कोतकर, तोसीफ शेख आणि सीमा चौधरी यांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता एक रिक्षाचालक सोन्याचे दागिने उचलताना दिसून आला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. त्याला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्याने दागिने सापडल्याची कबुली देत मिळालेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. यानंतर पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार सोन्याचा हार व कानातील रिंग मूळ मालक अशपाक कुरेशी यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आल्या. हरवलेले दागिने सुखरूप परत मिळाल्याने तक्रारदारांनी बाजारपेठ पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



