पाचोरा (प्रतिनिधी) : अमेझॉनचे पार्सल घेऊन आल्याचा बनाव करत भरदिवसा घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला असून, या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यात चोरी, घरफोडी व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाने या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला. सौ. कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२, रा. सातगाव डोंगरी, सध्या लक्ष्मी आंगन कॉलनी, पाचोरा) यांच्या घरी १२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता आरोपींनी अमेझॉनचे पार्सल आणल्याचे सांगून दरवाजा उघडून घेतला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी महिलांना व लहान मुलांना धाक दाखवत एका ठिकाणी बसवून ठेवले. आरोपींपैकी एकाने बंदुकीसारख्या वस्तूचा धाक दाखवत घरात सोन्याच्या चिपा असल्याची विचारणा केली. यानंतर घरातील कपाटांची झडती घेऊन साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले. आरोपींनी घरातील ७ हजार रुपये रोख रक्कम तसेच मुलाच्या गळ्यातील ७०० रुपये किमतीची वस्तू घेऊन पलायन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान १३ जून रोजी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचा मामा गोकुळ महादु वाघ (पाटील) (वय ३७, रा. सातगाव डोंगरी) याचाही सहभाग निष्पन्न झाला. तपास पुढे सरकत असताना योगेश परशराम शिंदे (वय ३१, रा. शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) याचा सहभाग उघड झाला. त्याच्याकडून चोरीतील ७,७०० रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली नकली खेळण्यातील पिस्तूल जप्त करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत या गुन्ह्यामागील संपूर्ण कटही उघडकीस आला. फिर्यादींच्या घरात सोन्याच्या चिप असल्याची माहिती गोकुळ वाघ याला मिळाल्यानंतर त्याने चोरीचा कट रचला. ही माहिती त्याने नितीन पाटील याला दिली. नितीन पाटील याने आपल्या परिचयातील इतर व्यक्तींना सहभागी करून घेत गुन्ह्याचे नियोजन केले. त्यानंतर चेतन भुतेकर याला सोबत घेऊन ही जबरी चोरी करण्यात आली. या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार, नियोजनकर्ते आणि प्रत्यक्ष सहभागी आरोपींपर्यंत पोहोचण्यात पाचोरा पोलिसांना यश आले असून, गुन्ह्याच्या संपूर्ण साखळीचा उलगडा करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, विलास पाटील, योगेश पाटील, हरीष परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी आणि नितीन भालेराव यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.



