भुसावळ (प्रतिनिधी):
शिलरत्न बुद्ध विहार येथे १४ रोजी पार पडलेल्या बैठकीत भारतीय बौद्ध महासभेच्या भुसावळ तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

बैठकीस महिला राज्य संघटक लताताई तायडे, जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सरदार, स्वरक्षण विभागाचे उपाध्यक्ष मेजर रमेश साळवे, संघटक ए. टी. सुरळकर, जिल्हा पर्यटन सचिव वसंतदादा लोखंडे, जिल्हा संघटक उत्तम सुरवाडे, हिशोब तपासनीस पंडित सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच माता भिमाई रामजी सपकाळे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर वंदना घेण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन सुशीलकुमार हिवाळे यांनी केले.
संस्थेच्या नियमांनुसार भुसावळ तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये बौद्धाचार्य राजेश भाऊराव आव्हाड यांची अध्यक्षपदी, आनंदमित्र सपकाळे यांची सरचिटणीसपदी, तर बौद्धाचार्य संभाजी सोमा सोनवणे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याशिवाय संस्कार विभागाच्या उपाध्यक्षपदी नितीन बोदडे, संरक्षण विभागाच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत वाघ, पर्यटन व प्रचार उपाध्यक्षपदी एस. पी. जोहरे, हिशोब तपासनीस म्हणून अरुण दादा तायडे, तालुका संस्कार सचिव म्हणून सुरेंद्र हिवाळे, तालुका संघटक म्हणून श्रावण साळुंखे तसेच संरक्षण विभाग सचिवपदी तायडे यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली.
अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीकडून भुसावळ तालुक्यात ग्रामीण भागात ग्राम शाखा स्थापन करून येत्या काळात श्रामणेर शिबिरे, महिला शिबिरे तसेच संस्थेने निर्देशित केलेली २४ प्रकारची विविध शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन अध्यक्ष व सरचिटणीस यांनी दिले.
शेवटी जिल्हा संघटक उत्तम सुरवाडे यांनी आभार प्रदर्शन केले.


