व्हॅलेंटाईन डे निमित्त विशेष लेख : खरंच प्रेम असतं का?

भुसावळ -. दरवर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. लाल गुलाब, हृदयाच्या आकाराचे गिफ्ट्स, सोशल मीडियावर प्रेमाच्या पोस्ट्स… सगळीकडे प्रेमाचा उत्सव दिसतो. पण या सगळ्या गजबजाटात एक प्रश्न मात्र मनात डोकावतो — खरंच प्रेम असतं का? आणि प्रेमाला खरंच एखादा दिवस असतो का?

प्रेमाचा दिवस असतो का?

प्रेम ही भावना आहे, व्यवहार नाही. ती कॅलेंडरच्या एका तारखेला मर्यादित नसते. आईचं लेकरावरचं प्रेम, मित्राचं निस्वार्थ साथ देणं, जोडीदाराची समजूतदार साथ — हे सगळं रोजचं असतं. मग प्रेम साजरं करायला एकाच दिवसाची गरज का पडावी?

खरं तर, प्रेम दाखवण्यासाठी दिवसाची गरज नसते; पण आठवण करून देण्यासाठी कधी कधी निमित्त लागतं. व्हॅलेंटाईन डे कदाचित तेच निमित्त असेल.

प्रेम आहे का?

हो, प्रेम आहे. पण ते प्रत्येकाला एकसारखं अनुभवायला मिळत नाही. काहींसाठी प्रेम म्हणजे त्याग, काहींसाठी समर्पण, काहींसाठी फक्त आकर्षण.
आजच्या काळात नात्यांमध्ये स्वार्थ, अपेक्षा, तुलना आणि अहंकार वाढला आहे. म्हणूनच अनेक संसार तुटताना दिसतात. मग वाटतं — जर प्रेम असतं तर कोणी कोणाला फसवलं असतं का?

पण इथेच प्रश्न आहे — ते खरंच प्रेम होतं का?

प्रेमाच्या नावाखाली कधी मोह असतो, कधी सवय असते, कधी गरज असते. जेव्हा गरज संपते तेव्हा नातं तुटतं. पण जे प्रेम असतं, ते परिस्थिती बदलली तरी टिकतं.

प्रेमाचे बाजारीकरण…..

आज प्रेमही बाजारात विकलं जातंय. महागडी गिफ्ट्स, डिनर डेट्स, ब्रँडेड वस्तू — जणू प्रेमाची किंमत ठरवली जाते आहे. सोशल मीडियावर प्रेम दाखवण्याची स्पर्धा आहे; पण मनातली ओल कमी होत चालली आहे.

प्रेम म्हणजे फक्त “I love you” म्हणणं नाही;
प्रेम म्हणजे “मी आहे तुझ्यासोबत” हे न बोलता जाणवणं .

मग खरं प्रेम काय?

खरं प्रेम म्हणजे …..

समोरच्याला बदलण्याचा हट्ट न धरणं

चुका स्वीकारणं

राग आला तरी हात न सोडणं

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास

प्रेम असतं, पण ते शोधावं लागतं — दुसऱ्यांत नाही, आधी स्वतःत. स्वतःवर प्रेम केलं की दुसऱ्यावरचं प्रेमही निस्वार्थ होतं.

शेवटी…

व्हॅलेंटाईन डे साजरा करा किंवा नका करू, पण प्रेमावरचा विश्वास सोडू नका. कारण जगात अजूनही आई मुलासाठी रात्रभर जागते, मित्र अडचणीत धावून येतो, आणि काही जोडपी आयुष्यभर एकमेकांचा हात घट्ट धरून चालतात.

प्रेमाचा दिवस एकच नसतो —
प्रेम असलं की प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन असतो. ❤️

लेखन….…दामिनी ..भुसावळ