भुसावळ ( प्रतिनिधी) – “फक्त उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे नव्हे, तर उत्तम नागरिक होणे हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे,” असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.

भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे येथे शाळेचा ११४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामस्थ, माजी विद्यार्थी तसेच शाळा परिवाराची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिगंबर पाटील, कृष्णा पाटील, सोपान पाटील, देविदास बोरसे, अरुण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चंदाबाई पाटील, गणपत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम करण्याचे आवाहन केले. तसेच शाळेच्या ११४ वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम अधिक रंगतदार केला.
उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम आनंदी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


