गजानन महाराज प्रकट दिनी भुसावळात घरफोडीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटा जेरबंद :

भुसावळ (प्रतिनिधी) – गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांच्या गडबडीत शहरातील चिकूचा मळा, रूपमोहन नगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना रविवारी (दि. ९) मध्यरात्री घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणात एका चोरट्यास पकडण्यात यश आले आहे.

रविवारी रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास परिसरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम सुरू होते. या वेळी घरातील पुरुष मंडळी कार्यक्रमासाठी बाहेर गेले असताना आशा बाळू पाटील, त्यांची आई गीताबाई व सून घरातील बेडरूममध्ये होत्या. याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने घराच्या मागील दरवाजाला जोरात धक्का देत घरात प्रवेश केला.

दरवाजा उघडताच सुनेच्या हातातील लहान नात खाटेवर पडली. घरात शिरलेल्या व्यक्तीला जाब विचारला असता त्याने चोरीच्या उद्देशाने आल्याचे सांगत सोने व पैशांची मागणी केली. महिलांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिक व कार्यक्रमासाठी जमलेले भाविक मदतीसाठी धावून आले.

नागरिकांनी चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने रॉबिन ललित अग्रवाल यांना मारहाण केली. अखेर संतप्त जमावाने त्या चोरट्यास पकडून दोरीने बांधले. मारहाणीत तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव अदनान शामसुद्दीन तांबोळी (रा. भुसावळ) असे असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच परिसरात शेजारी राहणारे देवेंद्र राजेश्वर पोंगलू यांनीही त्यांच्या घराच्या मागील दरवाजाला तिघा अनोळखी व्यक्तींनी धक्का देत तोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली असून, परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.