भुसावळला येत्या शुक्रवारपासून : उत्कर्ष कलाविष्कारचा खान्देशनाट्य महोत्सव : तीन दिवस सात नाटकांची विनामूल्य मेजवानी :


भुसावळ, (प्रतिनिधी ) : येथील ओबेनॉल फाउंडेशन प्रस्तुत व उत्कर्ष कलाविष्कार आयोजित स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक स्मृती १७ वा खान्देश नाट्य महोत्सव येत्या शुक्रवारपासून (ता. १३) सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सात नाटकांची मेजवानी रसिकांना विनामूल्य मिळणार आहे.
रेल्वेच्या श्री कृष्णचंद्र सभागृहात होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन संध्याकाळी साडेसहा वाजता ओबेनॉल फाउंडेशनचे संस्थापक अश्विनकुमार परदेशी यांच्या हस्ते होईल. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी मोहन घुगे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, ओबेनॉल फाउंडेशनच्या अध्यक्षा नम्रता परदेशी, बज्म ए इर्तेका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिद्धी शायर शकील हसरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी जळगावच्या परिवर्तन संस्थेचे ‘पालखी’ हे नाटक सादर होईल. दि. बा. मोकाशी यांच्या कादंबरीवर आधारीत वारीचा शोध घेणाऱ्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन शंभू पाटील यांनी केले आहे. शनिवारी (ता. १४) नाशिकच्या सपान संस्थेचे ‘कलगीतुरा’ हे लोककलेवर आधारित नाटक सादर होईल. या नाटकाचे लेखक दत्ता पाटील असुन दिग्दर्शक सचिन शिंदे आहेत. तर रविवारी (ता. १५) सकाळी दहा वाजता दोन बालनाट्ये आणि एक विडंबन नाट्य सादर होतील. यात महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ निर्मित नारायण घोडके लिखित व अलका भटकर दिग्दर्शित ‘हे तुम्हीही करू शकता’ तसेच तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय निर्मित, किरण कुमार अडकमोल लिखित व प्रितीशा पाटील दिग्दर्शित ‘च्या बही’ हे नाटक व नाहाटा महाविद्यालय भुसावळ निर्मित उमेश गोरधे लिखित व दिग्दर्शित ‘विंचू चावला’ हे विडंबन नाट्य सादर होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता मुंबईच्या पार्थ थिएटर निर्मित,मुकेश माचकर लिखित व मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘ मराठी वाड.मयाचा घोळीव इतिहास’ हे त्याचप्रमाणे उत्कर्ष कलाविष्कार निर्मित व अनिल कोष्टी लिखित व दिग्दर्शित ‘या प्रश्नाला उत्तर नव्हते’ हे नाटक सादर होईल. महोत्सवाच्या निमित्ताने परिसरात डॉ. विकास कोळंबे, डॉ. श्वेता सरोदे, राजेंद्र जावळे, मनोहर झांबरे व विकास जंजाळे यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच विविध कला आणि क्रीडा क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कलावंत व खेळाडूंना ‘उत्कर्ष सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यात संघपाल तायडे (गायक, जळगाव), रमाकांत भालेराव (नृत्य व मुर्तीकला), जुबेर अली ताबीश (शायर, नगरदेवळा), मनोज कुलकर्णी व जितेश मराठे (तबला), सचिन पाटील व कल्पेश इंगळे (क्रीडा) यांचा समावेश आहे.
सर्व नाटके विनामूल्य असून याचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान उत्कर्ष कलाविष्कार चे अध्यक्ष अनिल कोष्टी सचिव धर्मराज देवकर यांनी केले आहे.