जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद ते भुसावळ रोडवरील टोलनाका परिसरात महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन डंपर रंगेहात पकडण्यात आले असून पुढील कारवाईसाठी ते नशिराबाद पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहेत.

जळगाव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू उपशावर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, यापुढेही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या धडक कारवाईत नशिराबादचे मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजीत येवले, आसोद्याचे मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, आकाश कडभाने, सदानंद मुंडे, मयूर महाले तसेच वाहन चालक मनोज गोळे यांच्या पथकाने सहभाग घेतला. पथकाच्या सतर्कतेमुळे ही कारवाई यशस्वी ठरली आहे.
या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, परिसरात महसूल प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.


