मुंबई : राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या मालाड परिसरातील एका नामांकित शाळेत अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिपायाने अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले असून शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी शाळेच्या परिसरात घडली. शाळेतील शिपायाने मुलीला धमकावून आणि भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर भीतीपोटी चिमुकलीने बराच काळ कोणालाही काहीच सांगितले नाही, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.
काही दिवसांनंतर मुलीच्या वागण्यात बदल जाणवू लागल्याने पालकांना संशय आला. त्यांनी विचारपूस केल्यानंतर मुलीने रडत संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर पालकांनी ६ फेब्रुवारी रोजी संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार केल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला असता, उलट त्यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोपही पालकांनी केला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि शाळेचा सीईओ अनंत यज्ञीक (वय ६५) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१ (२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १०, १७ आणि २१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने मालाड परिसरातील पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासनाने नेमकी काय काळजी घेतली, याबाबत आता कठोर चौकशीची मागणी होत असून राज्यातील शाळांची सुरक्षा व्यवस्था पुन्हा तपासण्याची गरज अधोरेखित होत आहे.


