गण गण गणात बोते’च्या गजरात -भुसावळ येथे गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा :१५ हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: येथील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थानतर्फे रविवारी (दि. ८) श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यानिमित्त सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, अभिषेक, पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रगट दिनानिमित्त पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत श्रींचे स्नान, अभिषेक व पूजा करण्यात आली. सकाळी ६ वाजल्यापासून भाविकांनी ‘गण गण गणात बोते’चा जयघोष करीत सामूहिक पारायणास सुरुवात केली. या कार्यक्रमाला परिसरासह दूरदूरहून आलेल्या भाविकांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी सुमारे १५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादामध्ये सुमारे १४ ते १५ क्विंटल पोळ्या (चपात्या), १४० किलो हरभरा डाळीच्या पिठाचे पिठलं तसेच १७ हजार लाडू भक्तांना वाटप करण्यात आले. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वितरण सुरू होते.

सेवेकऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग

मंदिर परिसरात महाप्रसाद वाटप, दर्शन रांगांचे नियोजन व स्वच्छता राखण्यासाठी सेवेकऱ्यांनी दिवसभर सेवा दिली. त्यामुळे भाविकांना सुलभ व शिस्तबद्ध दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता आला.

दरम्यान, अनेक भाविकांनी महाप्रसादासाठी आवश्यक साहित्य व देणग्या जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात अर्पण केल्या.