डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलची दक्षायणी सपकाळे राज्यात प्रथम

भुसावळ (प्रतिनिधी ) – मुंबई येथे २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. होमी भाभा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी दक्षायणी सुबोध सपकाळे हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिने ‘ग्रेट लेव्हल–२’ चे प्रमाणपत्र मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ही स्पर्धा मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आपल्या वैज्ञानिक विचारशक्ती, निरीक्षण कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या जोरावर दक्षायणीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला ‘ग्रेट लेव्हल–२’ प्रमाणपत्रासह शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

दक्षायणी ही ताप्ती पब्लिक स्कूलच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी असून, या स्पर्धेत यश मिळवणारी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या नीना कटलर, उपप्राचार्या श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले.

राज्यात प्रथम आल्यामुळे दक्षायणीची आता ‘ग्रेट’ परीक्षेसाठी निवड झाली असून, तिला इस्रोच्या शैक्षणिक दौर्‍यासाठी तिरुवनंतपुरम येथे नेण्यात येणार आहे. या वेळी तिला १२ हजार रुपये रोख रक्कम, ट्रॉफी, सन्मानचिन्ह व अन्य बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.

या यशासाठी दक्षायणीला शाळेतील शिक्षकांचे तसेच तिचे वडील सुबोध सपकाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.