भुसावळात २६ एप्रिलला ‘आशादीप साहित्योत्सव’ ; राज्यस्तरीय साहित्यकृतींचा होणार गौरव :

भुसावळ (प्रतिनिधी ) – साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या भुसावळ शहरात आगामी २६ एप्रिल रोजी ‘आशादीप साहित्योत्सवाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ज्येष्ठ साहित्यिक डी. एस. घोडेस्वार यांच्या पाचव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात राज्यातील निवडक 30 साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

या साहित्योत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे घोडेस्वार परिवारातर्फे विविध साहित्य प्रकारांना दिले जाणारे प्रोत्साहन. कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र आणि समीक्षा अशा विविध प्रवाहांतील दर्जेदार लेखनाचा गौरव केला जाणार आहे. निवड समितीने प्राप्त झालेल्या अनेक प्रस्तावातून अत्यंत पारदर्शकपणे 30 सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड केली आहे. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. जतीन मेढे, मिलिंद बागुल, प्रा. वा. ना. आंधळे आणि प्रा. वासुदेव वले उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते मान्यवर लेखकांना सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमात केवळ पुरस्कार वितरणच नव्हे, तर साहित्यावर चर्चा आणि वैचारिक देवाणघेवाणही होणार आहे. साहित्योत्सवाचे दुसरे आकर्षण म्हणजे ‘बाप’ या विषयावर आयोजित केलेले विशेष कवी संमेलन. पितृत्वाच्या विविध भावना, कष्ट आणि प्रेम शब्दांत मांडण्यासाठी अनेक कवी या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

निवडक पुरस्कारांची घोषणा
आयोजक प्रज्ञा हंसराज बागुल यांनी माहिती दिली की, पुरस्कारांसाठी आलेल्या सर्वच साहित्यकृती उच्च दर्जाच्या होत्या. निवड समितीने दिलेल्या निकषांनुसार काही महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यात दया पवार स्मृती उत्कृष्ट आत्मचरित्र पुरस्कार, बी. जी. जोंधळे उत्कृष्ट संपादन पुरस्कार, रा. ग. जाधव उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ पुरस्कार याशिवाय आशादीप राज्यस्तरीय उत्कृष्ट कथा आणि कवितासंग्रह पुरस्कारांचा समावेश आहे. हा सोहळा भुसावळच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा ठरणार असून, जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे