सावदा (प्रतिनिधी) : गुजरातमधील पवित्र वडतालधामच्या अंतर्गत असलेल्या सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा ११३ वा पाटोत्सव (वर्धापन दिन) बुधवार, दि. २४ जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ११२ वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या या मंदिरातील श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्णदेव यांच्या आकर्षक व मनोहर मूर्तींच्या दर्शनाने हजारो भाविकांना आध्यात्मिक समाधान व संकटातून मुक्तीचा अनुभव मिळत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. मंदिराचे आयुष्य आणखी वाढावे आणि त्याचे मूळ स्वरूप जतन व्हावे, या उद्देशाने गेल्या वर्षभरापासून मंदिराच्या कळस व कळसाखालील कुंभांच्या दुरुस्ती व जतनाचे काम सुरू आहे. या कामामुळे मंदिराचे आयुष्य आणखी शंभर वर्षे वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच मंदिरातील सिंहासन सागवान लाकडापासून तयार करण्यात येत असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्याचे कामही सुरू आहे. याशिवाय मंदिरात कष्टभंजन देव व हनुमंतराय यांच्या नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाटोत्सवानिमित्त मंगळवार, दि. २३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता श्री स्वामीनारायण मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर, सावदा दरम्यान भव्य जलयात्रा काढण्यात येणार आहे. तर बुधवार, दि. २४ जून रोजी सकाळी ५.३० वाजता मंगळा आरती, सकाळी ७ वाजता अभिषेक दर्शन, सकाळी ८.३० वाजता ध्वजारोपण, सकाळी ९ वाजता सत्संग सभा, सकाळी १०.३० वाजता अन्नकूट आरती व सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजन कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त सत्संग समाज व महिला मंडळ, सावदा यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिरात शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी, विश्वप्रकाशदासजी, भक्तीप्रियदासजी, पुजारी सत्यप्रकाशदासजी, भंडारी माधवस्वामी तसेच वेदांत-व्याकरणाचार्य शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक सेवा सुरू आहेत. या पवित्र पाटोत्सव (वर्धापन दिन) सोहळ्यास परिसरातील सर्व भाविक व हरिभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्णदेवांचे दर्शन घेऊन धार्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांनी केले आहे.



